बहिरवलीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी माजी सरपंच नूर मोहम्मद चौगुले यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड

Gramin Varta
98 Views

खेड : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत म्हणून नावारूपास आलेल्या बहिरवली ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच नूर मोहम्मद हमजा चौगुले यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बुधवार, २ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखाने हा निर्णय घेतला.

बहिरवली ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा उत्साही वातावरणात पार पडली. या सभेत गावातील विविध नागरी समस्या आणि विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याच ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये गावातील शांतता, एकोपा आणि सलोखा टिकवून ठेवण्यात मोलाचे योगदान देणारे माजी सरपंच तसेच भाजपा नेते व खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांचे स्वीय सहाय्यक ओवैस चौगुले यांचे वडील नूर मोहम्मद हमजा चौगुले यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. ग्रामस्थांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सलग चौथ्यांदा या पदाची धुरा त्यांच्याकडे सोपविली.

या निवडीचे वृत्त समजताच भाजपा नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी दूरध्वनीवरून नूर मोहम्मद चौगुले यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सलग चौथ्यांदा मिळालेल्या या बहुमानाबद्दल बहिरवली ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून चौगुले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गावातील लहान-मोठे तंटे गावातच सामोपचाराने मिटवून ग्रामस्थांमध्ये परस्पर सहकार्य, बंधुभाव आणि शांतता राखण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष नूर मोहम्मद चौगुले यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण असून गावाच्या सर्वांगीण विकासाला आणखी गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

Total Visitors :
4797582
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *