वाशिष्ठी मच्छिमार व्यवसायिक सहकारी संस्थेची शासनाकडे मागणी; आ. शेखर निकम यांचे मंत्री नितेश राणे यांना निवेदन
चिपळूण (प्रतिनिधी) : पारंपरिक मासेमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमारांना नैसर्गिक तसेच मानवनिर्मित संकटांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मासेमारी व्यवसायातील घटते उत्पन्न आणि वाढता कर्जबोजा लक्षात घेता, शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’मध्ये समाविष्ट करून कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी वाशिष्ठी मच्छिमार व्यवसायिक सहकारी संस्था, चिवेली यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे सादर केले.
समुद्र तसेच खाड्यांमध्ये विविध पद्धतीने पारंपरिक मासेमारी करून मच्छिमार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत मासेमारी व्यवसायासमोर अनेक गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. एलईडी मासेमारी, डिझेलच्या पुरवठ्याशी संबंधित समस्या, नैसर्गिक आपत्ती, खाडी परिसरातील वाढते जलप्रदूषण तसेच अनधिकृत वाळू उपसा यामुळे पारंपरिक मासेमारीवर मोठा परिणाम होत आहे. परिणामी मासेमारीतून मिळणारे उत्पन्न घटत असून, अनेक मच्छिमार कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत.
मासेमारी व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने मच्छिमार कुटुंबांसमोर दैनंदिन उदरनिर्वाहासह कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक विवंचनेमुळे मच्छिमारांवरही टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मच्छिमारांना शेतकरी दर्जा देण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जमुक्तीच्या धर्तीवर मच्छिमारांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’मध्ये मच्छिमारांचा समावेश करून त्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी ठाम मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी चिपळूण पंचायत समितीचे माजी सदस्य पांडुरंग माळी, वाशिष्ठी मच्छिमार व्यवसायिक सहकारी संस्था, चिवेलीचे चेअरमन प्रभाकर सैतवडेकर, विलास वाजे, गणेश साबळे आदी उपस्थित होते. मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत मंत्री नितेश राणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, गोवळकोट ते करंबवणे खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने मच्छिमारांच्या मासेमारी व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे या खाडीतील साचलेला गाळ तातडीने काढण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. खाडीतील गाळ काढल्यास जलवाहतूक आणि मासेमारीस अधिक सुलभता निर्माण होऊन स्थानिक मच्छिमारांना त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, राज्याचे महसूल मंत्री योगेश कदम आणि आमदार भास्कर जाधव यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आले आहे. मच्छिमारांच्या आर्थिक अडचणी आणि मासेमारी व्यवसायासमोरील वाढती संकटे लक्षात घेऊन शासनाने कर्जमुक्तीच्या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मच्छिमार बांधवांकडून व्यक्त होत आहे.
कर्जमुक्ती योजनेत मच्छिमारांचाही समावेश करा
Leave a Comment






