भोस्ते घाटात खेड-चिपळूण एसटी बसला कंटेनरची धडक; सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

Gramin Varta
128 Views

खेड : खेड तालुक्यातील भोस्ते घाटात खेड-चिपळूण मार्गावरील एसटी बसला कंटेनरने धडक दिल्याची घटना घडली. घाटातील अवघड चढण चढत असताना एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कंटेनरची बसला धडक बसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, खेडहून चिपळूणच्या दिशेने एसटी बस प्रवासी घेऊन जात होती. भोस्ते घाटातील चढण आणि वळणाचा रस्ता पार करत असताना एका कंटेनरने एसटी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दोन्ही वाहनांची धडक झाली. धडकेनंतर कंटेनर चालकाने घटनास्थळी न थांबता तेथून पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघातावेळी एसटी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. धडकेच्या मोठ्या आवाजामुळे काही काळ घाट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून घटनेची दखल घेण्यात आली.

भोस्ते घाटातील तीव्र चढ-उतार, धोकादायक वळणे आणि वाढती अवजड वाहनांची वाहतूक लक्षात घेता वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या तसेच सोबतच्या वाहनांचा अंदाज न घेतल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे घाटमार्गावर वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Total Visitors :
4797028
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *