वर्षभरापासून बेपत्ता युवक लांजात सापडला ; लांजा पोलिसांच्या तत्परतेने युवक नातेवाईकांच्या स्वाधीन

Gramin Varta
913 Views

फरहान पाटणकर/ लांजा: लांजा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील वेरवली बुद्रुक येथे मानसिक स्थिती बिघडलेल्या अवस्थेत भटकत असलेल्या युवकाला लांजा पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घेत त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्याला त्यांच्या स्वाधीन केले. लांजा पोलिसांच्या या तत्परतेमुळे तब्बल वर्षभरापासून बेपत्ता असलेल्या युवकाची अखेर आपल्या कुटुंबीयांशी भेट झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वेरवली बुद्रुक येथे एक युवक बेवारस व मानसिक स्थिती बिघडलेल्या अवस्थेत भटकताना आढळून आला. त्याला संरक्षणाची आवश्यकता असल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ लांजा पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडून नातेवाईकांविषयी कोणतीही माहिती मिळत नव्हती. मात्र, त्याच्या खिशात आढळलेल्या एका कागदावर मोबाईल क्रमांक मिळून आला.

पोलिसांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता संबंधित युवकाचे नातेवाईक (भिवंडी, शिवाजीनगर) परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लांजा पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना तातडीने लांजा येथे येण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान युवकाच्या सुरक्षिततेसाठी त्याला भाकर संस्थेत ठेवण्यात आले.

दरम्यान, बुधवार २ सप्टेंबर रोजी त्या युवकाचे नातेवाईक (भिवंडी, शिवाजीनगर) येथून लांजा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी घेतलेल्या माहितीत सदर युवकाचे नाव मोहम्मद मुस्तकीम मासूम (वय २३, रा.भिवंडी, शिवाजीनगर) असल्याचे स्पष्ट झाले. तो मागील एक वर्षापासून घरातून बेपत्ता असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

पोलिसांनी नातेवाईकांची ओळख पटवून आवश्यक माहिती घेतल्यानंतर मोहम्मद मुस्तकीम याला त्यांच्या ताब्यात सुरक्षितपणे सोपविले. वर्षभरापासून बेपत्ता असलेला युवक सुखरूप मिळाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यवाहीसाठी भाकर संस्थेचे देवेंद्र पाटील तसेच वेरवली गावचे पोलीस पाटील कुळये यांचे सहकार्य लाभले. लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कार्यवाही केली.

Total Visitors :
4797028
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *