गणेश चतुर्थीपूर्वी चिपळूणचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार

Gramin Varta
9 Views

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही; मुंबई-गोवा महामार्ग सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा दावा

चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी चिपळूणचा उड्डाणपूल गणेश चतुर्थीपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. मुंबई-गोवा महामार्गावरील पाच उड्डाणपूल यापूर्वीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले असून, चिपळूणच्या उड्डाणपुलाचे कामही वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करताना भोसले यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामामागील विविध कारणांकडेही लक्ष वेधले. न्यायालयीन खटले, ठेकेदारांची चुकीची निवड, भूसंपादनातील अडचणी तसेच राजकीय हस्तक्षेपामुळे महामार्गाचे काम दीर्घकाळ रखडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आपण सार्वजनिक बांधकाम विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या कामासंदर्भात चार बैठका घेण्यात आल्या असून, कामाला गती देण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याच्या घोषणा यापूर्वीही अनेकदा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्र्यांपासून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपर्यंत विविध स्तरांवरून गणेशोत्सवात कोकणवासीयांना सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. ‘येवा कोकण आपलाच असा’ असे आवाहन करत कोकणातील प्रवास सुखकर होण्याचे चित्र दाखविण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात महामार्गाची रखडलेली कामे आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या यामुळे प्रवाशांना अद्यापही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या सुमारे १८ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण विविध कारणांमुळे रखडले आहे. या पार्श्वभूमीवर आता महामार्गावरील २० ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून, रत्नागिरी जिल्ह्यातील १७ ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्रे म्हणून समोर आली आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचा वेग आणि सुरक्षितता वाढण्यास मदत होऊन भविष्यात मुंबईहून कोकणात जाणारा प्रवास अधिक सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Total Visitors :
4796786
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *