लांजा उड्डाणपुलाच्या गळतीची उच्चस्तरीय चौकशी करा; उद्घाटनाच्या राजकीय घाईवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक

Gramin Varta
187 Views

लांजा (विशेष प्रतिनिधी): मागील सुमारे चौदा-पंधरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता पूर्णत्वाच्या टप्प्यावर आले असले तरी रस्त्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि लांजा उड्डाणपुलाला लागलेली गळती यावरून गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ आगामी गणेशोत्सवापूर्वी राजकीय श्रेय लाटण्यासाठी अपूर्ण व त्रुटीयुक्त महामार्गाच्या उद्घाटनाची घाई सुरू असल्याचा थेट आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम व जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस यांनी केला आहे. रस्ता रुंद झाला आणि केवळ फीत कापली म्हणजे महामार्ग दर्जेदार होत नाही, त्यामुळे संपूर्ण महामार्ग तसेच सर्व उड्डाणपूल सर्व निकषांनुसार सुरक्षित व प्रवासयोग्य झाल्याशिवाय घाईघाईने महामार्ग वाहतुकीसाठी खुला करू नये, असा स्पष्ट इशारा दोन्ही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा उपशेट्येवाडी येथील उड्डाणपुलाच्या काँक्रीट प्लेट्स सैल होणे आणि पहिल्याच पावसाळ्यात पुलाच्या भिंतीतून पाण्याची गळती सुरू होणे ही अत्यंत धक्कादायक व गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या संतापानंतर प्रशासनाने नेलिंगचे काम सुरू केले असले तरी गळती पूर्णपणे थांबलेली नाही. त्यामुळे मूळ दोषांवर केवळ वरवरची मलमपट्टी न करता लांजा उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट, काँक्रीटची गुणवत्ता चाचणी, जलनिस्सारण व्यवस्था आणि स्वतंत्र तज्ज्ञांमार्फत उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आजही महामार्गावर अनेक ठिकाणी असमान पृष्ठभाग, धोकादायक वळणे, पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार आणि अपुरे जलनिस्सारण यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६ च्या कलम ५ आणि कलम ८ नुसार महामार्गाची दुरुस्ती, देखभाल आणि सुरक्षेची मूळ जबाबदारी केंद्र सरकारची असून कंत्राटदाराकडे काम सोपवले म्हणजे प्रशासनाची सार्वजनिक जबाबदारी संपत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आयआरसीच्या मानकांनुसार संपूर्ण महामार्गाचे स्वतंत्र रोड सेफ्टी आणि क्वालिटी ऑडिट करून सर्व त्रुटी जनतेसमोर मांडल्या पाहिजेत.

गेल्या दीड दशकापासून धूळ, खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा सामना करणाऱ्या कोकणवासीयांना आता काम पूर्ण झाल्यावरही निकृष्ट कामाची शिक्षा आणि टोलचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागू नये, अशी ठाम भूमिका कदम आणि डोळस यांनी मांडली आहे. भविष्यात कोणत्याही निकृष्ट कामामुळे दुर्घटना घडल्यास संबंधित कंत्राटदार आणि देखरेख अधिकाऱ्यांवर थेट कायदेशीर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. कोकणवासीयांना उद्घाटनाचा दिखावा नको असून सुरक्षित प्रवासाची हमी हवी आहे, असे सांगत पाण्याचे झरे रोखण्यासोबतच कामातील गैरव्यवहाराच्या संशयाचे झरेही शोधून काढा, असा इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4733355
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *