प्रदर्शन, विक्री व पाककृती स्पर्धेत शेतकरी, महिला बचत गटांसह नागरिकांचा मोठा सहभाग
लांजा/अरबाज नेवरेकर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), रत्नागिरी अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, लांजा यांच्या वतीने आयोजित रानभाजी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी (दि. ११) काळे छात्रालय, लांजा येथे रानभाजी महोत्सव, प्रदर्शन, विक्री तसेच रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कोकणातील पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन करणे, त्यांचे पौष्टिक व आरोग्यदायी महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच स्थानिक शेतकरी व महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश होता.
महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवात कोकणातील विविध पारंपरिक रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. तसेच रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पौष्टिक व आकर्षक पदार्थांचे सादरीकरण पाककृती स्पर्धेत करण्यात आले.
रानभाज्यांचे पौष्टिक व औषधी गुणधर्म, पारंपरिक उपयोग तसेच त्यापासून तयार होणाऱ्या विविध पदार्थांची माहिती नागरिकांना देण्यात आली. परिसरातील शेतकरी, महिला बचत गट, कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रदर्शन व विक्रीला मिळालेल्या प्रतिसादामुळे स्थानिक शेतकरी व महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांसाठी थेट ग्राहक मिळण्यास मदत झाली.
बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक रानभाज्यांचा आहारातील वापर कमी होत असताना अशा उपक्रमातून रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. रानभाज्यांचे संवर्धन करण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगार व उत्पन्नाच्या संधी निर्माण करण्यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरला.
यावेळी गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख, नायब तहसीलदार अनिल गोसावी, नायब तहसीलदार दर्शन देसाई, तालुका कृषी अधिकारी अभिजीत शेलार, कृषी विज्ञान केंद्र देवधेचे प्रमुख डॉ. आनंद हनुमंते, कृषी अधिकारी सुभाष गुरव, पंचायत समिती सदस्य रसिका मेस्त्री, साक्षी चव्हाण व दिपाली साळवी, कल्पना कॉलेजचे शिक्षक चंदन कातळकर व प्रीतम तेंडुलकर, डीआरपी आरिता तेंडुलकर तसेच रत्नागिरी काजू प्रक्रिया युनिटचे अध्यक्ष जयवंत विचारे आदी उपस्थित होते.
रानभाजी पाककृती स्पर्धेतील विजेत्यांना १५ ऑगस्ट रोजी बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गौरी शेरे तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
लांजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Leave a Comment






