लांजा : येथे जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून, यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये व्याघ्र संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. कुसुमताई वंजारे महाविद्यालय येथे वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग, लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवा पिढीत वाघ संरक्षण, वन्यजीव संवर्धन आणि जैवविविधतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील, रत्नागिरी प्रादेशिकचे वनक्षेत्रपाल विक्रम गुरव व लांजा सामाजिक वनीकरणाचे वनक्षेत्रपाल साहेल शेख उपस्थित होते. यावेळी साहेल शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वाघ हा जंगलातील अन्नसाखळीतील सर्वोच्च घटक असून त्याचे संवर्धन म्हणजे संपूर्ण जंगल आणि जलस्रोतांचे संरक्षण करणे होय. त्यांनी विद्यार्थ्यांना व्याघ्र संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी टायगर फेस पेंटिंग व व्याघ्र संवर्धन विषयावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फेस पेंटिंग स्पर्धेत भक्ती जाधव व याशिका ठकराल यांनी प्रथम, तर मृण्मयी करंजकर व रिया कांबळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमात विजेत्यांना चषक व वृक्षरोपे देण्यात आली, तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही वृक्षरोपे देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी डॉ. विक्रांत बेर्डे व डॉ. दिग्विजय लवटे यांनीही वाघांच्या संवर्धनाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लांजा वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक सचिन कांबळे, श्रावणी पवार, सिद्धार्थ हिंगमिरे आणि नमिता कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.






