उद्धव ठाकरेंना आणखी धक्का; महिला नेत्या वैशाली दरेकर-राणे यांचा पदाचा राजीनामा

Gramin Varta
209 Views

ठाणे: कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर-राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला. मात्र पक्षाचे सदस्यत्व कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला कल्याण लोकसभा मतदारसंघात आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. पक्षाच्या कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांनी पक्षाचे सदस्यत्व कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. त्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा चर्चेचा विषय ठरत आहे.

वैशाली दरेकर-राणे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारणे असल्याचे सांगितले आहे. वैयक्तिक कारणांमुळे संघटनेच्या कामासाठी आवश्यक वेळ देता येत नसल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, त्यांनी आपण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सदस्य म्हणून पुढेही कार्यरत राहणार असल्याचेही नमूद केले आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर कल्याणच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. भविष्यात त्या कोणती राजकीय भूमिका घेणार, पक्षातच सक्रिय राहणार की पुढे वेगळा निर्णय घेणार, याबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. मात्र, सध्या तरी त्यांनी पक्ष सोडत नसल्याचे स्पष्ट केल्याने पुढील घडामोडींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4630023
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *