गणेशोत्सवात भाविकांची लूट खपवून घेणार नाही; अवाजवी भाडे आकारणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

Gramin Varta
214 Views

रिक्षा व बस वाहतूकदार संघटनांसोबत पोलीस-परिवहन विभागाची संयुक्त बैठक; रेल्वे स्थानकांसह प्रमुख रिक्षा थांब्यांवर भाडेदराचे फलक

रत्नागिरी: आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या चाकरमानी व भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि त्रासमुक्त व्हावा, यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेबाबत कडक भूमिका घेतली आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे अथवा प्रवाशांशी गैरवर्तन करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारांमध्ये सहभागी असलेल्या चालक तसेच संबंधित वाहनमालकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पोलीस व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसह रिक्षा व बस वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाढणारी प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था, प्रवाशांची सुरक्षितता आणि भाडे आकारणी याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

गणेशोत्सव काळात प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी परिवहन विभागाने निश्चित केलेले रिक्षा भाडेदर नागरिकांना सहजपणे उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्ह्यातील रेल्वे स्थानके तसेच प्रमुख रिक्षा थांब्यांवर भाडेदराचे फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिकृत भाडेदराची माहिती मिळणार असून, त्यापेक्षा अधिक रक्कम आकारल्यास संबंधितांविरुद्ध तक्रार करता येणार आहे.

- Advertisement -

रिक्षा चालकांनी स्टँडवर वाहने शिस्तबद्ध पद्धतीने उभी करावीत, जेणेकरून वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करू नये आणि प्रवाशांशी सौजन्याने वागावे, असेही स्पष्ट करण्यात आले. बस वाहतूकदारांनी आपल्या वाहनांमधील आपत्कालीन दरवाजा, अग्निशामक यंत्रणा आणि प्रथमोपचार पेटी सुस्थितीत असल्याची खात्री करावी. गणेशोत्सवाच्या काळात संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बसेसच्या सुटण्याच्या वेळांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही बसमालकांना देण्यात आल्या.

दरम्यान, मद्यप्राशन करून किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या चालकांवर प्रशासनाची विशेष नजर राहणार आहे. अशा प्रकारात चालक दोषी आढळल्यास केवळ चालकाविरुद्धच नव्हे, तर संबंधित बसमालकाविरुद्धही फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.

गणेशोत्सवाच्या काळात प्रवास करताना कोणत्याही रिक्षा किंवा बस वाहतूकदाराकडून अवाजवी भाडे आकारले गेल्यास अथवा प्रवाशांशी उद्धट किंवा गैरवर्तन केले गेल्यास नागरिकांनी वाहनाचा क्रमांक, प्रवासाचा तपशील आणि शक्य असल्यास संबंधित पुराव्यासह dyrto.08-mh@gov.in या अधिकृत ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, मोटार वाहन निरीक्षक अरविंद फुलारी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे, महामार्ग पोलीस निरीक्षक दीपाली जाधव, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे यांच्यासह रिक्षा व बस वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Total Visitors :
4796786
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *