रत्नागिरी : तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा जनहित फाउंडेशनचे संस्थापक प्रथमेश गोपाळ गावणकर यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता खंडाळा येथील स्वप्नपूर्ती हॉटेलजवळ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास खंडाळा पंचक्रोशीतील शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रथमेश गावणकर यांनी केले आहे.
गावणकर हे गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच शेतकरी, कामगार आणि मजुरांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत. जनसामान्यांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि संबंधित प्रश्नांना कायदेशीर मार्गाने वाचा फोडण्यासाठी त्यांनी सहा महिन्यांपूर्वी खंडाळा येथे जनसंपर्क कार्यालय सुरू केले होते.
या कार्यालयात नागरिकांकडून विविध समस्या घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सामाजिक प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य मिळावे, या उद्देशाने हे कार्यालय कार्यरत राहणार असल्याचे गावणकर यांनी सांगितले.
नूतनीकरणानंतर कार्यालयाचा उद्घाटन समारंभ परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून, पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
खंडाळ्यात प्रथमेश गावणकर यांच्या नूतनीकरण केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे ५ सप्टेंबरला उद्घाटन
Leave a Comment






