रत्नागिरी : कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल (भा.प्र.से.) बुधवार, दिनांक २ आणि गुरुवार, दिनांक ३ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या जिल्ह्यातील ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण’ (SIR), महसूल विषयक कामकाज, मतदान केंद्रे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा तसेच लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
२ सप्टेंबर दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, बुधवारी विभागीय आयुक्त चिपळूण उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल होतील. तदनंतर त्या मतदान केंद्र व नगर परिषद/ग्रामपंचायतीस प्रत्यक्ष भेट देतील.
दुपारी त्या चिपळूण व रत्नागिरी मतदारसंघातील शाळेतील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी करतील. जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी ४ ते ५ या वेळेत एसआयआर (SIR) व महसूल विषयांबाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
गुरुवार, दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात त्या राजापूर नगरपरिषद व स्थानिक मतदान केंद्रांची पाहणी करतील व त्यानंतर पुढील दौऱ्यासाठी त्या कणकवलीकडे (सिंधुदुर्ग) रवाना होतील.







