रत्नागिरी : पाच दिवसांचे बँकिंग लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने

Gramin Varta
48 Views

रत्नागिरी:पाच दिवसांचे बँकिंग तातडीने लागू करावे, केंद्र सरकारच्या एकतर्फी व भेदभावपूर्ण PLI योजनेची अंमलबजावणी स्थगित करून ती मागे घ्यावी, तसेच प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या प्रमुख मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU), रत्नागिरीच्या वतीने शिवाजीनगर येथे बँक ऑफ इंडिया, झोनल ऑफिस येथे विविध बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.

8 मार्च 2024 रोजी झालेल्या बाराव्या द्विपक्षीय वेतन करारातील 9व्या जॉइंट नोटमध्ये इंडियन बँक्स असोसिएशनने पाच दिवसांचे बँकिंग लागू करण्यास सहमती दर्शवून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. मात्र, दोन वर्षांहून अधिक काळ उलटूनही हा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, पाच दिवसांचे बँकिंग तातडीने लागू करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

बँकांच्या कामगिरीवर आधारित पार्टटाइम कर्मचाऱ्यांपासून स्केल VII पर्यंतच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना समान दिवसांचा PLI देण्याबाबत युनियन व IBA यांच्यात सहमती झाली होती. मात्र केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार स्केल IV व त्यावरील अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र PLI योजना लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रस्तावित योजनेनुसार स्केल IV ते VII अधिकाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक कामगिरीच्या आधारे 365 दिवसांपर्यंतचा पगार PLI म्हणून मिळू शकतो, तर पार्टटाइमपासून स्केल III पर्यंतच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा पगार देण्याची तरतूद आहे. ही व्यवस्था भेदभावपूर्ण असून बँकांवर अनावश्यक आर्थिक भार टाकणारी आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. देशातील सुमारे 8 लाख बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांपैकी स्केल IV ते VII मधील सुमारे 40 हजार अधिकारी म्हणजेच केवळ 5 टक्के कर्मचारीवर्गासाठी इतरांपेक्षा मोठ्या प्रमाणात PLIची तरतूद केली जात आहे, तर उर्वरित 95 टक्के कर्मचारी व अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा पगार PLI म्हणून देण्याची भूमिका घेतली जात असल्याने युनियनने या धोरणाला तीव्र विरोध केला.

या निदर्शनात महिला बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला. या आंदोलनाचे नियोजन विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन केले.

Total Visitors :
4776339
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *