पोलीस दल आणि रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला सुरुवात
रत्नागिरी : अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याविरोधात जनजागृती करून समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दल आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’ रेन रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांसह पोलीस अधिकारी व अंमलदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या जनजागृती उपक्रमाला पालकमंत्री डॉ. उदय सामंत तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेन रन मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणाईला दूर ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त करण्यात आली. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या गंभीर परिणामांविषयी जनजागृती करण्यासोबतच नशामुक्त समाजनिर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची देशातील उत्कृष्ट पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाल्याबद्दल यावेळी त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवर, पोलीस अधिकारी, अंमलदार आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘रेन रन’मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती, तरुणाईचे संरक्षण आणि नशामुक्त समाजनिर्मितीचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
या उपक्रमामुळे ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’च्या संकल्पाला व्यापक जनसमर्थन मिळाले असून, अंमली पदार्थांच्या विरोधातील लढ्यात पोलीस प्रशासनासोबत नागरिकांनीही सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘मिशन फिनिक्स’अंतर्गत रत्नागिरीत ‘रेन रन’; ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’चा निर्धार
Leave a Comment





