खेड-वडगाव एसटी बसचा अस्तान-चाटव सीमेजवळ अपघात; सहा प्रवासी सुखरूप

Gramin Varta
115 Views

खेड : खेड आगारातून वडगाव-खेड मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला रविवारी दुपारी अस्तान-चाटव सीमेजवळ अपघात झाला. एमएच १४ बीटी २७५६ क्रमांकाची ही बस पुलाच्या अलीकडे अचानक घसरून रस्त्याच्या कडेला नदीच्या दिशेने गेल्याने काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने बसमधील सर्व सहा प्रवासी सुखरूप असल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेड आगाराची वडगाव-खेड एसटी बस रविवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास सहा प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली होती. अस्तान-चाटव सीमेजवळ पुलाच्या अलीकडे बस आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला घसरली आणि नदीच्या दिशेने गेली. त्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमधील सर्व सहा प्रवासी सुरक्षित असल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटी प्रशासनानेही घटनास्थळाची माहिती घेतली असून, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :
4780885
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *