खेड: आठ महिन्यांपूर्वी हरवलेले पाकीट जसेच्या तसे परत; रिक्षाचालक सिकंदर कुंभार्लीकर यांच्या प्रामाणिकपणाचा गौरव

Gramin Varta
120 Views

खेड : प्रामाणिकपणा आणि माणुसकी अजूनही समाजात जिवंत असल्याचा प्रत्यय खेड शहरात आलेल्या एका घटनेतून आला आहे. आठ महिन्यांपूर्वी हरवलेले पाकीट त्यातील रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे यांसह जसेच्या तसे परत करून भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटनेचे रिक्षाचालक सिकंदर कुंभार्लीकर यांनी समाजासमोर प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला आहे.

अहमद चौगुले यांचे आठ महिन्यांपूर्वी पाकीट हरवले होते. या पाकिटामध्ये तब्बल ४ हजार २०० रुपये रोख रक्कम तसेच विविध महत्त्वाची कागदपत्रे होती. हे पाकीट रिक्षाचालक सिकंदर कुंभार्लीकर यांना मिळाले. तब्बल आठ महिन्यांनंतर त्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता हे पाकीट त्यातील रोख रक्कम आणि कागदपत्रांसह अहमद चौगुले यांच्याकडे जसेच्या तसे परत केले.

सिकंदर कुंभार्लीकर यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल अहमद चौगुले यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, युसूफ चौगुले, वहिद चौगुले, भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम साहिबोल, भाजपा युवा मोर्चाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, साजिद रावल आणि भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते.

यावेळी ॲड. वैभव खेडेकर यांनी सिकंदर कुंभार्लीकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत, समाजामध्ये चांगला आदर्श निर्माण करण्याचे काम त्यांनी केले असल्याचे सांगितले. रिक्षाचालक हा समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला घटक असून, सिकंदर कुंभार्लीकर यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा इतर रिक्षाचालकांनीही आपल्या पुढील वाटचालीत जपावा, असे आवाहन त्यांनी केले.

आठ महिन्यांनंतरही पाकिटातील एकही वस्तू किंवा रक्कम कमी न करता ती मूळ मालकाला परत करणाऱ्या सिकंदर कुंभार्लीकर यांच्या कृतीचे खेड शहरातून कौतुक होत असून, त्यांच्या प्रामाणिकपणाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

Total Visitors :
4723676
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *