उक्षी रेल्वे थांब्याच्या लढ्याला संघटनात्मक बळ; ‘उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समिती’च्या कोअर कमिटीची स्थापना

Gramin Varta
199 Views

रत्नागिरी: उक्षी रेल्वे स्थानकावर ‘दिवा–सावंतवाडी’ आणि ‘सावंतवाडी–दिवा’ या दोन्ही गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या जनआंदोलनाला आता संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे. उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष कमिटीच्या कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून, या माध्यमातून रेल्वे थांब्याच्या मागणीसाठी अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

उक्षी पंचक्रोशीतील सुमारे २० ते २५ गावांसाठी उक्षी रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे प्रवासी केंद्र आहे. या स्थानकावर उक्षी परिसरासह परचुरी, वांद्री, करबुडे, बावनदी, कोळंबे, आंबेड, सोनगिरी, मानसकोंड, कुरधुंडा, चाफे, ओरी, जाकादेवी, पोचरी, देण,खालगाव, फुणगूस, डिंगणी, रानपाट, लाजुल, सप्तलिंगी, नरबे, कोंडये, पीरंदवणे, उजगव, नांदळज, कोसुंब, ताम्हाणे, आंबवली आदी भागांतील नागरिक प्रवासासाठी अवलंबून आहेत.

पूर्वी या स्थानकावर दिवा–सावंतवाडी आणि सावंतवाडी–दिवा या दोन्ही गाड्यांना थांबा मिळत होता. मात्र, कोरोना महामारीनंतर रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आल्यानंतर या गाड्यांचे उक्षी स्थानकावरील थांबे बंद करण्यात आले. परिणामी पंचक्रोशीतील नोकरदार, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा, यासाठी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष कमिटीच्या माध्यमातून प्रशासन, कोकण रेल्वे आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. मुझम्मील काझी यांची अध्यक्षपदी, तर हरिश्चंद्र बंडबे आणि प्रदीप चंदरकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रमेश मेस्त्री सचिव, अब्दुल मुनाफ खतिब सहसचिव, तर अविनाश कळंबटे खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

समितीच्या संघटकपदी वसंत मेस्त्री आणि चंद्रकांत वेद्रे, कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. अरुण नागवेकर, तर सल्लागार म्हणून अनंत कळंबटे आणि गोविंद कळंबटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शरद जाधव आणि सुरेश कळंबटे यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कोअर कमिटीच्या सदस्यांमध्ये सत्यवान वेद्रे, रवींद्र जाधव, उदय बेनकर, नंदकुमार कुवार, गजानन पानगले, पांडुरंग पाताडे, जगन्नाथ दुदम, संदीप सापटे, नितीन चंदरकर आणि प्रकाश शिगवण यांचा समावेश आहे.

उक्षी स्थानकावर बंद झालेले रेल्वे थांबे पुन्हा सुरू व्हावेत, हा केवळ उक्षी गावाचा प्रश्न नसून संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळवून देणे, प्रवाशांच्या अडचणी प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे, या दिशेने संघर्ष समिती काम करणार आहे. तसेच गावागावातून सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे.

उक्षी रेल्वे स्थानकाचा प्रश्न आता केवळ मागणीपुरता मर्यादित न राहता संघटित लढ्याच्या दिशेने पुढे सरकला असून, ‘दिवा–सावंतवाडी’ आणि ‘सावंतवाडी–दिवा’ या गाड्यांना पुन्हा थांबा मिळवून देण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार कोअर कमिटीने केला आहे.

Total Visitors :
4723673
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *