मुंढेंमुळे जनतेला मिळतेय सुरक्षित आणि पोषक अन्न; असे अधिकारी महाराष्ट्रात व्हायला हवेत
रत्नागिरी / अजय सावंत : दूध-पनीरपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरीतील अन्नाच्या गुणवत्तेपर्यंत अन्नभेसळीविरोधात सुरू झालेल्या धडक कारवायांनी सध्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर कारवाईला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्य नागरिकांमध्येही या कारवाईबाबत समाधान व्यक्त होत आहे. मात्र यापूर्वीचे अधिकारी अशी कारवाई का करत नव्हते असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुकाराम मुंढेंमुळे आता महाराष्ट्रातील जनतेला शुद्ध आणि पौष्टिक अन्न मिळत आहे. त्यामुळे साहजिकच लाखो नागरिकांचे आशीर्वाद त्यांना लाभत आहेत. आणि जनताही त्यांच्या सोबत आहे.
अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणारे, निकृष्ट दर्जाची उत्पादने विकणारे, खाद्य व्यवसायातील नियमांचे उल्लंघन करणारे तसेच प्रतिबंधित पदार्थांचा वापर करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून छापे, तपासणी आणि जप्तीची कारवाई केली जात आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संशयित किंवा नियमबाह्य माल जप्त झाल्याने अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणालेत; मग पूर्वीचे अधिकारी काय करत होते, असा थेट सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे. कारण अन्नभेसळ हा केवळ कायद्याचा विषय नसून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये केवळ कागदोपत्री तपासणी न होता प्रत्यक्ष आणि सातत्यपूर्ण कारवाई होणे आवश्यक आहे.
मुंढे यांच्या कार्यपद्धतीची सध्या सोशल मीडियावरही चर्चा होत असून, त्यांच्या धडक कारवाईचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. सुरक्षित आणि पोषक अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याने अशा प्रकारे काम करणारे अधिकारी महाराष्ट्रात अधिक प्रमाणात असावेत, अशी भावना व्यक्त होत आहे.
मात्र, या कारवाईच्या निमित्ताने आणखी एक महत्त्वाचा प्रश्न समोर येत आहे. आज अन्नभेसळ, निकृष्ट दर्जाची उत्पादने आणि नियमभंग करणाऱ्या खाद्य व्यवसायांविरोधात एवढ्या प्रभावीपणे कारवाई होत असेल, तर यापूर्वी अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने का झाल्या नाहीत? दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ, हॉटेल-रेस्टॉरंट, बेकरी आणि इतर खाद्य व्यवसायांची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी प्रशासनाचीच होती. मग या तपासण्या कितपत प्रभावीपणे झाल्या, याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे.
रत्नागिरीकडेही नागरिकांचे लक्ष
राज्यातील विविध भागांत अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाया सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यातही अशाच पद्धतीने सातत्यपूर्ण तपासणी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी तसेच इतर खाद्य व्यवसायांची नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
भेसळखोरीला कोणत्याही स्तरावर संरक्षण मिळत असेल, तर त्याचीही चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई झाली पाहिजे. कारण नागरिकांच्या ताटात काय येते, याचा थेट संबंध त्यांच्या आरोग्याशी आहे. त्यामुळे अन्नसुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता प्रशासनाने सातत्याने कारवाई करणे गरजेचे आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या कारवायांमुळे जनतेला सुरक्षित आणि पोषक अन्न मिळण्याबाबतचा विश्वास अधिक मजबूत होत आहे. त्यामुळे अशाच कार्यक्षम आणि जबाबदार अधिकाऱ्यांची गरज महाराष्ट्राला आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, अन्नपदार्थ, औषधे आणि इतर नियमनाधीन उत्पादनांबाबत संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी. भेसळ किंवा नियमभंगाची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यास मदत होऊ शकते.
आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणालेत; मग पूर्वीचे अधिकारी काय करत होते?
Leave a Comment





