खेड : खेड पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत दोन तरुणांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून गांजासह एकूण १ लाख ९७२ रुपये ९९ पैशांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (३ ऑगस्ट) दुपारी भोस्ते येथील जगबुडी नदीवरील पुल ते देवना पुलाकडे जाणाऱ्या नदीकाठच्या रस्त्यावर करण्यात आली.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अंमली ड्रग्स अँड सायकोअॅक्टिव्ह सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा क्रमांक २१६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई सोहेल इकबाल ढगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी इरफान इद्रीस खान (वय १९, रा. मुस्लिम मोहल्ला, आंबेड खुर्द, ता. संगमेश्वर) आणि मोहम्मद साद साजिद शहा (वय १८ वर्षे ११ महिने, रा. दखनी मोहल्ला, कसबा, ता. संगमेश्वर) या दोघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडे विक्रीसाठी ठेवलेला १ हजार ७२ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा तसेच अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आवश्यक साहित्य आढळून आल्याने त्यांना रंगेहात अटक करण्यात आली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी १५ हजार ९७२ रुपये ९९ पैशांचा गांजा, १५ हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा पी४ पॉवर ५जी स्मार्टफोन, २० हजार रुपये किमतीचा विवो व्ही६० ५जी स्मार्टफोन तसेच ५० हजार रुपये किमतीची पर्ल व्हाईट रंगाची टीव्हीएस ज्युपिटर १२५ (एमएच ०८ बीएच ३१११) दुचाकी असा एकूण १ लाख ९७२ रुपये ९९ पैशांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करीत असून परिसरातील अंमली पदार्थांच्या साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.






