साळवी स्टॉपवर चुकीच्या दिशेने आलेल्या दुचाकीची धडक; देवरुखचा तरुण जखमी, अज्ञातस्वाराविरोधात गुन्हा

Gramin Varta
136 Views

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे चुकीच्या दिशेने भरधाव दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या अपघातात देवरुख येथील संदिप लक्ष्मण भारते (वय ३२) हे जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप भारते हे २३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील होंडा पॅशन प्रो दुचाकी क्रमांक एमएच ०८ ओआर ०१५९ घेऊन कोल्हापूर ते रत्नागिरी शहर मुख्य रस्त्याने रत्नागिरीच्या दिशेने जात होते. साळवी स्टॉप येथील स्वरूप बार अँड रेस्टॉरंटसमोर सार्वजनिक रस्त्यावर ते आले असता समोरून एक अज्ञात दुचाकीस्वार होंडा डिओ दुचाकीवरून येत होता.

पोलिस तक्रारीनुसार, संबंधित दुचाकीस्वार रत्नागिरी शहरातून नाचणे लिंक रोडकडे जाण्यासाठी असलेल्या एकमार्गी रस्त्यावर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवत होता. रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वाहन हयगयीने व बेदरकारपणे चालवल्याने त्याने संदिप भारते यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या धडकेत भारते यांना किरकोळ तसेच गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे.

या प्रकरणी पोहेकॉ रणजित रमाकांत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २७ ऑगस्ट रोजी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, संबंधित दुचाकीस्वाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitors :
4771676
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *