दापोली : तालुक्यातील केळशी मोहल्ला येथे पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला आठ जणांनी मारहाण केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळशी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ सायंकाळी सुमारे ४.४० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी रिजवान दाऊद अलबा (वय ३२, व्यवसाय मच्छीमारी, रा. नबी मोहल्ला, केळशी, ता. दापोली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी रियाज अली बोरकर याच्यासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून रियाज अली बोरकर याच्यासह कबीर इलियास चाऊस, अली इलियास चाऊस, समीउल्ला फराज चाऊस, इलियास अली चाऊस, फईम इलियास चाऊस, जमशीद इलियास चाऊस आणि वहीद आशिफ खमसे यांनी रिजवान अलबा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी रियाज बोरकर याने डाव्या डोळ्यावर ठोसा मारल्याने दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर इतर आरोपींनी जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच रियाज बोरकर याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, रिजवान यांना सोडविण्यासाठी आलेले त्यांचे मित्र अबरार इस्माईल डायली, रियान इकबाल चाऊस, नाजीम इकबाल डायली, तसेच त्यांची आई हमीदा दाऊद अलबा आणि मेहुणे मसूद शरीफ बोरकर यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत मसूद शरीफ बोरकर यांच्या उजव्या गालावर दुखापत झाल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी २७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३९ वाजता दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलमे १८९(२), १९०, १११(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१)(३)/१३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दापोली: ‘तुला आज संपवतोच’ म्हणत केळशीत पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Leave a Comment






