दापोलीत बार चालू आहे का असे विचारत एकावर जॅकच्या रॉडने प्राणघातक हल्ला

Gramin Varta
137 Views

दापोली : तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दापोली येथील हॉटेल व्होल्गा वळणे परिसरात बार चालू आहे का असे विचारत एका व्यक्तीवर जॅकच्या लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास हॉटेल व्होल्गा वळणे, ता. दापोली येथे घडला. फिर्यादी महादेव लाया दोरकलकर (वय ४० वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. व्होल्गा हॉटेल वळणे, ता. दापोली, मूळ रा. हर्णे मलखांब पेठ, ता. दापोली) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

घटनेच्या दिवशी फिर्यादी महादेव दोरकलकर हे त्यांची पत्नी सुप्रिया आणि मुलगी कशिश कैलास कदम यांच्यासह हॉटेल व्होल्गा येथे असताना एक चार चाकी गाडी हॉटेलच्या गेटमध्ये आली. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना बार चालू आहे का असे विचारले. फिर्यादी यांनी नाही असे सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर गाडीवरील चालक अंकित जाधव याने गाडीतून जॅकचा रॉड काढून फिर्यादी यांच्या डोक्यात डाव्या बाजूस मारून गंभीर दुखापत केली. तसेच त्याच्यासोबत असणारे सुमेध रूख्खे आणि अन्य एक अज्ञात इसम यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नी आणि मुलीला शिवीगाळ व दमदाटी करून मारण्याची धमकी दिली.

दापोली पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या एमएलसी वरून दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री एक वाजून दोन मिनिटांनी या प्रकरणी नोंद करण्यात आली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५), ११८(१), ३५१(२), ३५२ आणि इतर संबंधित कलमांनुसार आरोपी अंकित जाधव, सुमेध रूख्खे (दोघेही रा. तेरेवायंगणी, ता. दापोली) आणि एक अन्य अज्ञात इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -
Total Visitors :
4710145
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *