दापोली मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था होणार अधिक सक्षम; ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’च्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना

Gramin Varta
163 Views

दापोली: दापोली विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची पहिली बैठक नुकतीच पंचायत समिती, दापोली येथे गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला असून, अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.

बैठकीत बोलताना मंत्री योगेशदादा कदम यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार व वेळेत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदे तातडीने भरणे, नवीन उपकेंद्रांचे प्रस्ताव सादर करणे, सर्पदंश व श्वानदंशावरील लसींचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत पोस्टमार्टम रूमच्या उभारणीचे प्रस्ताव तातडीने सादर करणे यांसारख्या मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय, आयुष्मान आरोग्य मंदिरे, माता-बाल आरोग्य, लसीकरण मोहिमा, PMJAY शिबिरांचे आयोजन आणि १०८ रुग्णवाहिका सेवेचा प्रभावी वापर करण्यावरही भर देण्यात आला. दापोली येथे महा डायलिसिस युनिट सुरू करण्यात आल्याबद्दल मंत्री महोदयांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, दापोली पंचायत समिती सभापती उन्मेष राजे यांच्यासह तिन्ही तालुक्यातील विविध लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :
4827207
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *