रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी चोख सुरक्षा व्यवस्था; विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्याकडून बंदोबस्ताचा आढावा

Gramin Varta
124 Views

रत्नागिरी: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून उत्सव शांततेत, सुरक्षित व उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा (भा.पो.से.) यांनी ८ व ९ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यास भेट देऊन संपूर्ण गणेशोत्सव बंदोबस्ताचा आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी महामार्गावरील वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था आणि महत्त्वाच्या विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून पोलीस प्रशासनाला आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा १२७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तर १ लाख ६९ हजार ५३८ खाजगी घरांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. विसर्जन काळात समुद्रकिनारे, खाड्या, नद्या आणि तलाव या प्रमुख विसर्जनस्थळांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ५८ पोलीस अधिकारी आणि ६५० पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले असून, अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज असणारी आरसीपीची (RCP) २ पथके आणि क्यूआरटीची (QRT) २ पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. याशिवाय एसआरपीएफची (SRPF) एक कंपनी तसेच अतिरिक्त ५०० होमगार्ड, २० पोलीस अधिकारी आणि १०० पोलीस अंमलदारांची कुमक बंदोबस्तासाठी मागवण्यात आली आहे.

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची आणि गणेशभक्तांची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर १४ ठिकाणी नियोजित पेंडॉल म्हणजेच फिक्स पॉईंट उभारण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने सामोरे जाण्यासाठी महामार्गावर ५९ रुग्णवाहिका आणि ३३ क्रेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडीची ठिकाणे, अरुंद पूल, बॉटलनेक पॉईंट आणि ब्लॅक स्पॉटसह प्रामुख्याने खेडचा जगबुडी पूल, चिपळूणचा वाशिष्ठी नदी पूल, संगमेश्वरचा शास्त्री पूल, लांजाचा अंजणारी पूल आणि वेरळ घाट या ठिकाणांचा विशेष आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले.

या संपूर्ण पाहणी दौऱ्यावेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्यासमवेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, पोलीस उपअधीक्षक आकांक्षा यादव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -
Total Visitors :
4827287
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *