बुरोंडीच्या नव्या मासेमारी बंदराला गती; महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून जागेची प्रत्यक्ष पाहणी

Gramin Varta
54 Views

दापोली: दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित असलेल्या नवीन मासेमारी बंदराच्या कामाला आता प्रशासकीय स्तरावर वेग आला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांचे कार्यकारी अधिकारी श्री. मेटकर यांनी २२ ऑगस्ट रोजी बुरोंडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन प्रस्तावित बंदराच्या जागेची पाहणी केली.

या दौऱ्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यापूर्वी १८ मे रोजी मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या दालनात या संदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. त्या बैठकीत बंदराच्या आराखड्यावर आणि तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार झालेल्या या पाहणीत अधिकाऱ्यांनी भौगोलिक परिस्थिती व आवश्यक पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. या प्रकल्पाच्या कामाला प्रशासनाकडून लवकरात लवकर गती देऊन ते पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही श्री. मेटकर यांनी यावेळी दिली.

बुरोंडी हे तालुक्यातील प्रमुख किनारी गाव असून येथील बहुसंख्य कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांसह हे बंदर प्रत्यक्षात साकारल्यास स्थानिक मच्छीमारांची मोठी गैरसोय दूर होणार असून, स्थानिक रोजगारनिर्मितीसह परिसराच्या आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. मंत्रालयातील बैठकीनंतर तातडीने झालेल्या या पाहणी दौऱ्यामुळे ग्रामस्थ व मच्छीमार बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आता प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4750429
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *