राजापूर (तुषार पाचलकर): राजापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल लांजेकर तर सचिवपदी रमाकांत मोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष एजाज भाई पन्हळेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर लांजेकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच लांजेकर यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या सचिवपदी कात्रादेवी-सागवे विभागातील औषध विक्रेते रमाकांत मोंडे यांची सर्वानुमते निवड झाली.
तालुका केमिस्ट संघटनेची सर्वसाधारण सभा राजापूर येथील यशोदीन मंगल कार्यालयात प्रदीप वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत संघटनेच्या नवीन कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल लांजेकर यांनी उपस्थितांचे आभार मानताना औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू, असा विश्वास व्यक्त केला. तसेच संघटनेच्या सर्व सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सभेच्या शेवटी मजिद पन्हळेकर यांनी आभार प्रदर्शन केले. या सभेला तालुक्यातील औषध विक्रेते व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






