राजापूर : पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्वराज्य सभा निवडणूक उत्साहात संपन्न

Gramin Varta
365 Views

पाचल / तुषार पाचलकर: येथील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल येथे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण रुजविण्यासाठी आणि लोकशाही व्यवस्थेतील निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी शालेय स्वराज्य सभेची निवडणूक उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. प्रत्यक्ष निवडणुकीच्या धर्तीवर झालेल्या या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी जोरदार प्रचार करत शाळेचा विकास आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते.

मतदानाच्या दिवशी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करत सर्व विद्यार्थ्यांनी गुप्त मतदान पद्धतीद्वारे आपले मत नोंदवले. मतमोजणीनंतर लगेचच निवडणूक निकाल घोषित करण्यात आले. यामध्ये शालेय स्वराज्य सभेच्या मुख्यमंत्री पदी कुमार अर्णव प्रशांत नारकर तर उपमुख्यमंत्री पदी कुमार ओम विजय कदम विजयी झाले.

या निवडणुकीत विजयी झालेले वर्ग प्रतिनिधी, मुलींची राखीव प्रतिनिधी, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. राजेश सावंत, कार्याध्यक्ष मा.श्री. अशोक सक्रे, सचिव मा.श्री. रामचंद्र वरेकर, सहसचिव मा.श्री. किशोर नारकर, खजिनदार मा.श्री. राजन लब्दे तसेच सर्व सन्माननीय संचालक, मुख्याध्यापिका श्रीम. आशा गुरखे, पर्यवेक्षिका श्रीम. प्रमिला गांधी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्गाने अभिनंदन केले. शालेय स्वराज्य सभा ही केवळ एक निवडणूक नसून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवण्याची पहिली पायरी आहे, असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा गुरखे यांनी यावेळी व्यक्त केले. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व संचालन श्री. दीपक सुर्वे सर यांनी शाळेच्या शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी प्रतिनिधींसोबत अत्यंत उत्कृष्टपणे केले असून पालकवर्गातून या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4693421
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *