राजापुरात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
401 Views

राजापूर : राजापूर तालुक्यातील ताम्हाणे गावात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ३ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली असून, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०८ व ३(५) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी सरिता संजय ताम्हणकर (वय ५२, रा. ताम्हाणे, ताम्हणकरवाडी, ता. राजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नामदेव गोविंद ताम्हणकर, अनिता नामदेव ताम्हणकर, मनोहर सोमा ताम्हणकर, मनिषा मनोहर ताम्हणकर, विशाल मनोहर ताम्हणकर आणि सागर मनोहर ताम्हणकर (सर्व रा. ताम्हाणे, ता. राजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामदेव गोविंद ताम्हणकर व अनिता नामदेव ताम्हणकर यांचा मुलगा प्रथमेश याचा २०१५ साली मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूसाठी फिर्यादींचे पती संजय गोविंद ताम्हणकर यांनी केलेल्या देवदेवस्कीला जबाबदार धरत आरोपी गेल्या दहा वर्षांपासून त्यांना वारंवार टोचून बोलणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

तसेच जमीन वादाच्या कारणावरून आरोपी मनोहर सोमा ताम्हणकर, मनिषा मनोहर ताम्हणकर, विशाल मनोहर ताम्हणकर आणि सागर मनोहर ताम्हणकर यांनी फिर्यादींचे पती संजय ताम्हणकर तसेच मुलगी प्रियांका आणि मुलगा साहिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरही जमीन वादातून सातत्याने शिवीगाळ व मानसिक छळ करून संजय ताम्हणकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4637032
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *