पाचल/ तुषार पाचलकर: मधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजापूर तालुक्यातील तळवडे या गावात दिनांक 26 जुलै रोजी आरंभ व्यसनमुक्ती केंद्र व ग्रामपंचायत तळवडे यांच्या संयुक्त विद्यमाने बहवा या झाडाची दोन हजार रोपे लावण्यात आली.
या उपक्रमात तळवडे गावच्या सरपंच सौ. गायत्री अमित साळवी, ग्रामसेवक मंगेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते अप्पा साळवी, संदीप बारस्कर, चंद्रकांत लिंगायत, पत्रकार सुरेश गुडेकर, आरंभ केंद्राचे सचिव संतोष परडाकार, अध्यक्ष योगेश गवस, मागील वर्षातील आरंभचे शेकडो व्यसनमुक्त साधक सहभागी झाले होते. आरंभची स्थापना फेब्रुवारी 2023 मध्ये झाली असून या अडीच वर्षांत आरंभने अडीचशे पेक्षा जास्त व्यसनधारकांना व्यसनमुक्त केले आहे. दर सहा महिन्यांनी आरंभ ही संस्था स्नेहमिलन आयोजित करते, या स्नेहमिलनाचे औचित्य साधून आजचा वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष योगेश गवस यांनी सांगितले. सध्या आरंभ येथे एकवीस पेशन्ट आपला इलाज करत असून, या ठिकाणी येऊन खूप प्रसन्न वाटते आणि आम्हांला नवीन आयुष्य मिळाल्याचा आनंद होत असल्याचे ते सांगत आहेत. नाशिक, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, दापोली, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, बांदा यांसहित संपूर्ण महाराष्ट्रातून पेशन्ट येत असल्याचे संस्थापक अध्यक्ष योगेश गवस यांनी सांगितले आहे.





