ग्रामीण शाळा वाचविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा : सुहास आयरे

Gramin Varta
54 Views

मिळंद येथील कै. आत्माराम आयरे विद्यालयात ५४ वा स्मृती दिन उत्साहात

राजापूर/तुषार पाचलकर  : तालुक्यातील मिळंद येथील कै. आत्माराम आयरे विद्यालयात कै. आत्माराम शिवाजीराव आयरे यांचा ५४ वा स्मृती दिन मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामदा खोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुहास आयरे होते.

प्रारंभी कै. आत्माराम आयरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कै. आत्माराम आयरे यांचा स्मृती दिन हा विद्यालयातील विद्यार्थी व पालकांसाठी दसरा-दिवाळीच्या सणासारखा असतो. त्यामुळे या दिवसाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहत असतात.

यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष सुहास आयरे यांनी शासनाच्या शैक्षणिक धोरणांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, शासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांमुळे ग्रामीण भागातील शाळा अडचणीत आल्या आहेत. केवळ पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. पटसंख्येची अट तात्काळ काढून न टाकल्यास येत्या एक-दोन वर्षांत ग्रामीण भागातील अनेक शाळा बंद होण्याची भीती आहे. माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन आपल्या शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून, शासनाच्या या धोरणाविरोधात संस्था चालक, पालक आणि विद्यार्थ्यांनी संघटितपणे आवाज उठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

राजापूर-लांजा मतदारसंघाचे माजी आमदार गणपतदादा कदम यांनी ग्रामीण भागातील वाढत्या स्थलांतराचा प्रश्न उपस्थित केला. गावांमध्ये नोकरी, धंदा आणि व्यवसायाच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. गावात विकासासाठी येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. उद्योग आले नाहीत तर विकास होणार नाही. तरुण रोजगारासाठी मुंबईसारख्या शहरांकडे जातील, गावे ओस पडतील, घरे बंद राहतील आणि त्याचा थेट परिणाम ग्रामीण शाळांवर होऊन शाळाही बंद पडतील. याचा गांभीर्याने विचार राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी करणे आवश्यक असल्याचे कदम यांनी नमूद केले.

शिक्षण महर्षी चंद्रकांत देशपांडे यांनी कै. आत्माराम आयरे विद्यालयाच्या वाटचालीचे कौतुक केले. सुहास आयरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागातून हे ज्ञानमंदिर उभे राहिले असून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तब्बल ५४ वर्षे संस्था अविरतपणे कार्यरत आहे. या विद्यालयातून प्रशासकीय अधिकारी, वकील, डॉक्टर आणि उद्योजक घडले आहेत. संस्था अध्यक्ष सुहास आयरे यांचे कार्य कौतुकास्पद, समाजाला प्रेरणादायी आणि आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उबाठा पक्षाचे जिल्हा उपप्रमुख डोळस यांनी आयरे विद्यालयाला आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक वर्षात विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

कार्यक्रमास शिक्षण महर्षी चंदुभाई देशपांडे, सुहासभाई आयरे, पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास, माजी उपसरपंच किशोरभाई नारकर, पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आण्णा पाथरे, सामाजिक कार्यकर्ते अनंत कोलते, केंद्रप्रमुख संदीप परटवकर गुरुजी, मिळंद गावच्या सरपंच कीर्ती आयरे, योगेश आयरे सर यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :
4798856
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *