जुन्या पेन्शनसाठी शालेय कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

Gramin Varta
6 Views

रत्नागिरी/ अमित जाधव: महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तसेच नंतर १०० टक्के अनुदान प्राप्त झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय कर्मचाऱ्यांनी १ ते ४ सप्टेंबरदरम्यान काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदविला आहे.

खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनचा प्रश्न गेल्या बारा वर्षांपासून प्रलंबित असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. काही कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह खाती सुरू असून काहींची खाती बंद करण्यात आली आहेत. या प्रश्नासंदर्भात विविध विभागांतील उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या असून तीन खंडपीठांनी जुनी पेन्शन देण्याच्या बाजूने निर्णय दिल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. मात्र, न्यायालयीन निर्णयांनंतरही शासन स्तरावर अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेल्या सात वर्षांपासून सुनावणी सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. शासनाने सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करण्यास मान्यता दिली असतानाही पुढील कार्यवाही झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर विविध टप्प्यांत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या वेळी आंदोलनकर्ते तोंडाला काळे मास्क लावून सहभागी होणार असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान काही सेवानिवृत्त शिक्षकांकडून इच्छामरणाची मागणीही करण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. तसेच राज्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

दरम्यान, शासनाने २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत जुनी पेन्शनच्या प्रश्नावर सकारात्मक व योग्य निर्णय न घेतल्यास २८ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यस्तरीय आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनाला राज्यातील मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी विनाअट पाठिंबा जाहीर केल्याचा दावा करण्यात आला आहे.

या निर्णायक आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पेन्शनपीडित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचे समन्वयक संदेश राऊत, रत्नागिरी जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुफील पटेल, जिल्हा सचिव संदेश रहाटे आणि जिल्हा सहसचिव महेंद्र पवार यांनी केले आहे.

Total Visitors :
4798887
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *