रत्नागिरी : विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्यासोबत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मिळावे, तसेच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रत्नागिरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) ‘वाहनचालक प्रशिक्षण शाळा’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडून या उपक्रमाचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. मात्र, काही आयटीआयमध्ये जागेचा प्रश्न तर काही ठिकाणी वाहनांचा प्रश्न असल्याने प्रशिक्षण शाळा सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रस्तावित प्रशिक्षणासाठी आवश्यक जागा व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणासोबत वाहन चालविण्याचे कौशल्य आत्मसात करता येणार आहे. तसेच वाहन चालविण्यासोबत वाहन दुरुस्तीचे तांत्रिक प्रशिक्षणही दिले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
‘मेकॅनिकल मोटार व्हेईकल’ या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाचा विशेष फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणासोबत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मिळाल्यास त्यांच्या कौशल्यात भर पडणार आहे.
दरम्यान, वाहनचालक प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आयटीआयकडे स्वतःचे वाहन असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी वाहनांची रचना, योग्य ट्रॅक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. काही आयटीआयमध्ये जागेची मर्यादा असल्याने संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील काही आयटीआयमध्ये १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने आरटीओच्या नियमानुसार वापरातून बाद झाली आहेत. त्यामुळे नवीन वाहनांची उपलब्धता हा देखील महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक प्रशिक्षणासाठी ट्रॅक उभारण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ ड्रायव्हिंगचे कौशल्य नव्हे, तर वाहन दुरुस्तीचे तंत्रही शिकता येणार असून सहा महिने ते एक वर्षाचा अभ्यासक्रम असणार आहे. त्यामुळे आयटीआयमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.
आयटीआयमध्ये ‘वाहनचालक प्रशिक्षण शाळा’ सुरू होणार
Leave a Comment






