रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या दरात मोठी वाढ झाली असून, यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. मिठाई तयार करण्यासाठी लागणारे साखर, दूध, तूप, मैदा, बेसन तसेच काजू, बदाम, अंजीर यांसारख्या सुका मेव्याच्या दरात वाढ झाल्याने विविध प्रकारच्या मिठाईचे दर सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. सणासुदीच्या काळात मिठाईला मोठी मागणी असल्याने ग्राहकांना वाढीव दराचा सामना करावा लागत आहे.
गणेशोत्सवात घराघरांत गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. गणपती व गौरीसाठी नैवेद्य तसेच प्रसाद म्हणून मिठाईची खरेदी केली जाते. सार्वजनिक मंडळांकडूनही मोठ्या प्रमाणात मिठाई, पेढे व बुंदी लाडू खरेदी केले जातात. त्यामुळे या काळात मिठाईच्या मागणीत लक्षणीय वाढ होते.
मिठाईच्या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम पेढे, जिलबी, बुंदी लाडू, काजू कतली, अंजीर बर्फी, मँगो बर्फी, ड्रायफ्रूट बर्फी आदी पदार्थांवर झाला आहे. दूध, तूप, खवा आणि साखरेच्या वाढलेल्या किमतीमुळे मिठाई तयार करण्याचा खर्च वाढला आहे. त्यातच सुका मेवा महागल्याने ड्रायफ्रूटपासून तयार होणाऱ्या मिठाईचे दरही वाढले आहेत.
साध्या पेढ्याचे दर सध्या प्रतिकिलो सुमारे ६०० ते ८०० रुपये, तर जिलबीचे दर २०० ते २५० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. बुंदी लाडूचे दरही १५० ते २०० रुपये प्रतिकिलोच्या आसपास आहेत. पूर्वीच्या तुलनेत मिठाईच्या किमती वाढल्याने ग्राहकांना खरेदी करताना बजेटचा विचार करावा लागत आहे.
दरम्यान, मिठाई तयार करताना दर्जेदार व सुरक्षित कच्चा माल वापरण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी व कारवाई सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याने बाजारातही त्याचा परिणाम दिसून येत आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी हे सण येणार असल्याने मिठाईची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात मिठाईचे दर आणखी वाढणार का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
गणेशोत्सवात मिठाई, पेढे महागले; दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ
Leave a Comment





