‘वर्ल्ड स्कूल समिट २०२६’साठी दोन श्रेणींत नामांकन; ‘बेस्ट स्कूल’ आणि ‘बेस्ट मॅनेजमेंट’साठी निवड
सैतवडे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच शैक्षणिक, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, सैतवडे आणि दि. मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे यांच्या शैक्षणिक वाटचालीला आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल मिळाली आहे. मलेशियातील क्वालालंपूर येथील Asia Pacific University of Technology & Innovation (APU) येथे २६ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या ४१व्या वर्ल्ड स्कूल समिट २०२६साठी दि. मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेचे दोन श्रेणींमध्ये नामांकन झाले आहे.
या आंतरराष्ट्रीय समिटसाठी जगभरातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळांना विविध निकषांच्या आधारे नामांकन दिले जाते. शाळेची शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रांतील कामगिरी, कला-क्रीडा क्षेत्रातील योगदान तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था व शाळेमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम यांचा विचार या प्रक्रियेत करण्यात आला.
दि. मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेची ‘Best School in Rural Area’ आणि ‘Best Management in Rural Area’ या दोन महत्त्वपूर्ण श्रेणींसाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील शाळेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मिळालेले हे नामांकन सैतवडे गावासह रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठीही उल्लेखनीय मानले जात आहे.
नामांकन प्रक्रियेसाठी मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, सैतवडेचे विद्यमान सचिव तसेच दि. मॉडेल इंग्लिश स्कूलचे क्लर्क रुमान मकबूल पारेख यांनी संस्थेच्या वतीने ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक माहिती व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर वर्ल्ड स्कूल समिटच्या आयोजकांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत ई-मेलद्वारे शाळेची दोन श्रेणींमध्ये नामांकनासाठी निवड झाल्याची माहिती देण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत शाळेने विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. या शैक्षणिक वाटचालीची आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली दखल ही संस्था, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या प्रयत्नांना मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.
या यशाबद्दल मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रहीम हसन माद्रे, सचिव रुमान मकबूल पारेख, संस्थेचे सर्व पदाधिकारी, दि. मॉडेल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती देशमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
सैतवडेसारख्या ग्रामीण भागातून शिक्षणाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटलेली ही छाप भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला भौगोलिक मर्यादा नसतात, हे या नामांकनातून अधोरेखित झाले आहे.
सैतवडेच्या दि. मॉडेल इंग्लिश स्कूलची आंतरराष्ट्रीय भरारी
Leave a Comment




