कोकणासाठी कृषी यांत्रिकीकरणाची स्वतंत्र सोडत; चिपळूण-संगमेश्वरातील ७१९ शेतकऱ्यांची निवड

Gramin Varta
24 Views

आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश; आधुनिक कृषी अवजारांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

चिपळूण, प्रतिनिधी : कोकणातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अधिक प्रभावीपणे लाभ मिळावा, यासाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी कोकण विभागाची स्वतंत्र सोडत जाहीर करण्यात आली असून, चिपळूण तालुक्यातील ३३१ आणि संगमेश्वर तालुक्यातील ३८८ अशा एकूण ७१९ शेतकऱ्यांची निवड झाली आहे.

महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अर्ज करूनही राज्यस्तरीय सोडतीमध्ये संधी न मिळाल्याने कोकणातील अनेक शेतकरी पूर्वसंमतीच्या प्रतीक्षेत होते. परिणामी ट्रॅक्टर, पॉवर टिलर तसेच विविध आधुनिक कृषी अवजारांचा लाभ घेण्यास विलंब होत होता.

कोकणाची डोंगराळ भौगोलिक रचना, भातशेतीचे प्राबल्य आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीतील प्रत्यक्ष अडचणी लक्षात घेता, या भागासाठी स्वतंत्र सोडत घेण्यात यावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी शासन आणि कृषी विभागाकडे केली होती. या मागणीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने कोकण विभागासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेची स्वतंत्र सोडत जाहीर केली आहे. त्यामुळे चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ७१९ शेतकऱ्यांना आधुनिक कृषी अवजारांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या निर्णयामुळे कोकणातील शेतकऱ्यांना शेतीची कामे अधिक सुलभपणे आणि कमी वेळेत करण्यास मदत होणार असून, शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागणीला न्याय मिळाल्याने या निर्णयाचे शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे.

Total Visitors :
4786258
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *