डेरवण येथे क्रॉसकंट्रीसह जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन

Gramin Varta
21 Views

८ सप्टेंबरला एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात स्पर्धा; विजेत्यांना ५५ हजारांची रोख पारितोषिके

चिपळूण:श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट, डेरवण यांच्या वतीने भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर स्मृती क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष असून, ८ सप्टेंबर २०२६ रोजी एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात क्रॉसकंट्री स्पर्धेसह जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धाही होणार आहे.

क्रॉसकंट्री स्पर्धेत १२, १४, १६ आणि १८ वर्षांखालील मुला-मुलींसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले आहेत. १२ वर्षांखालील मुला-मुलींसाठी २ किलोमीटर, १४ वर्षांखालील मुला-मुलींसाठी ३ किलोमीटर, १६ वर्षांखालील मुला-मुलींसाठी ४ किलोमीटर, तर १८ वर्षांखालील मुलांसाठी ६ किलोमीटर आणि मुलींसाठी ४ किलोमीटर अंतराची शर्यत होणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५५ हजार रुपयांची रोख पारितोषिके, पदके आणि प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना आरोग्यदायी आणि स्पर्धात्मक धावण्याचा अनुभव मिळणार आहे.

टेबल टेनिसची जिल्हास्तरीय निवड चाचणी

क्रॉसकंट्री स्पर्धेसोबतच यावर्षी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी विविध गटांत स्पर्धा होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिकृत निवड चाचणीचा भाग म्हणून या स्पर्धा घेतल्या जाणार असून, निवड झालेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील टेबल टेनिसपटूंना आपले कौशल्य सादर करण्यासोबतच स्पर्धात्मक अनुभव मिळणार आहे. सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर टी-शर्ट देण्यात येणार आहेत.

शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शिस्त आणि सांघिक भावना वाढविणाऱ्या या क्रीडा उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. खेळ ही जीवनशैली असून, शरीरासोबतच मनाची शिस्त आणि सामूहिक भावना जोपासणारे प्रभावी माध्यम असल्याने जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २ सप्टेंबर २०२६ ही अंतिम नोंदणी तारीख आहे. अधिक माहितीसाठी ९८२२६३९३०६, ९३२५४४९२०१, ९३२५८९७८७७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitors :
4755951
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *