चिपळुणात अंगावर काटा आणणारा थरार; 10 वर्षाच्या मुलीने मगरीच्या तावडीतून आईला वाचवले

Gramin Varta
638 Views

चिपळूण : तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीच्या काठावर बुधवारी सायंकाळी अंगावर शहारे आणणारी घटना घडली. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या नंदिनी भुपेंद्र पवार (वय ३५) यांच्यावर दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक हल्ला केला. मगरीने त्यांचा पाय जबड्यात पकडून त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत नंदिनी यांनी काठावरील दगड घट्ट पकडून ठेवला. त्याचवेळी हा प्रकार पाहणाऱ्या त्यांच्या अवघ्या १० वर्षांच्या मुलीने धाडस दाखवत आईचा हात पकडून तिला पाण्याबाहेर खेचले. त्यामुळे नंदिनी यांचा जीव वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी पवार या सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास आपली मुलगी स्वर्णी हिच्यासोबत घरामागील वाशिष्ठी नदीच्या घाटावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या कपडे धुत असताना पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक त्यांच्यावर झडप घातली. मगरीने नंदिनी यांच्या पायाचा जबड्यात पकड घेत त्यांना खोल पाण्याकडे ओढण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेल्या नंदिनी यांनी आरडाओरड करत काठावरील मोठा दगड पकडला.

आईला मगर पाण्यात ओढत असल्याचे लक्षात येताच स्वर्णी घाबरून न जाता तातडीने आईच्या मदतीला धावली. तिने आईचा हात घट्ट पकडून आपल्या परीने सर्व ताकद लावत तिला पाण्याबाहेर खेचले. या चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे नंदिनी पवार यांचा जीव वाचला. या घटनेत जखमी झालेल्या नंदिनी यांना तातडीने कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी वनविभागाच्या पथकासह कामथे रुग्णालयात धाव घेतली. वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक के. डी. इरमले, वनरक्षक रा. भा. गुंटे, लिपिक एस. ए. कलावंत आणि आरआरटी सदस्य अथर्व घाग यांनी रुग्णालयात जाऊन नंदिनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना धीर देत वनविभाग त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिष्ठी नदी परिसरात मगरींचा वावर वाढल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. नदीत पोहणे, कपडे किंवा जनावरे धुण्यासाठी पाण्यात जाणे टाळावे. तसेच लहान मुलांना नदीकाठावर अथवा पाण्यात जाऊ देऊ नये, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी सांगितले. दरम्यान, संकटाच्या क्षणी आईचा जीव वाचवण्यासाठी धाडस दाखवणाऱ्या १० वर्षीय स्वर्णीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitors :
4734337
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *