गुहागरमध्ये खून करण्याच्या इराद्याने धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर

Gramin Varta
5 Views

ॲड. अलंकार विखारे यांच्या युक्तिवादाला यश; ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचे चिपळूण जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश

चिपळूण : गुहागर शहरातील वरचापाट येथे राहणाऱ्या संदीप तुकाराम गिजे याने ६ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास किर्तनवाडी येथे राहणाऱ्या मंगेश काशिनाथ माटल यांच्या राहत्या घरी जाऊन कौटुंबिक वाद आणि संशयाच्या कारणावरून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार कोयत्याने डोक्यावर वार केले होते. या हल्ल्यात मंगेश माटल यांच्या कानाच्या मागे तसेच उजव्या खांद्यावर जीवघेण्या दुखापती झाल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी संदीप गिजे याला तात्काळ अटक केली होती. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची रवानगी विशेष कारागृह, रत्नागिरी येथे करण्यात आली होती.

संशयित आरोपीला जामीन मिळण्यासाठी ॲड. अलंकार विखारे यांनी त्याच्या वतीने चिपळूण जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जाला गुहागर पोलिसांसह सरकारी पक्षाने तीव्र हरकत नोंदवली होती.

मात्र आरोपीच्या वतीने बाजू मांडताना ॲड. अलंकार विखारे यांनी पोलिसांचे तपासकाम जवळपास पूर्ण झाले असून, जखमी व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर जखमांचे स्वरूप जीव घेणे होते, असे मानता येणार नाही, असा तार्किक युक्तिवाद केला.

ॲड. अलंकार विखारे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून चिपळूण येथील जिल्हा सत्र न्यायाधीशांनी संशयित आरोपी संदीप गिजे याची ५० हजार रुपये रकमेच्या जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश पारित केले आहेत.

Total Visitors :
4841694
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *