तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग सुकर; अलोरेतील ३३ घरांचे १२ सप्टेंबरला लोकार्पण, पालकमंत्री उदय सामंतांकडून पाहणी

Gramin Varta
86 Views

चिपळूण: तिवरे धरण दुर्घटनेतील विस्थापित कुटुंबांच्या पुनर्वसनाचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न आता अखेर निकाली निघत असून, अलोरे येथे उभारण्यात आलेल्या पुनर्वसन वसाहतीतील ३३ घरांचे लोकार्पण शनिवार, १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी अलोरे येथे अचानक भेट देऊन या नव्याने बांधण्यात आलेल्या घरांची आणि परिसरातील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. सिद्धिविनायक ट्रस्ट आणि सिडकोच्या आर्थिक सहकार्यातून तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून ही सर्वसोयींनी युक्त पक्की घरे पूर्णत्वास आली आहेत. या पाहणीदरम्यान पालकमंत्र्यांनी उर्वरित १९ घरांच्या वाटपाबाबत ग्रामस्थांनी सामोपचाराने आणि एकमताने निर्णय घ्यावा, एकमत न झाल्यास प्रांताधिकाऱ्यांमार्फत अधिकृत सोडत काढून पारदर्शक पद्धतीने घरांचे वाटप केले जाईल, अशी स्पष्ट भूमिका मांडली.

या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री सामंत यांनी परिसरातील इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. गेल्या गणेशोत्सवात वाहून गेलेल्या पुलासाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून काम वेगाने सुरू करण्यात आले असून, त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, राजकीय घडामोडींवर भाष्य करताना ‘ऑपरेशन टायगर’ सारख्या हालचाली पूर्वकल्पना देऊन होत नसून अचानक घडतात, असा सूचक टोला त्यांनी लगावला. तसेच गणेशोत्सवातील डीजे आणि पारंपरिक वाद्यांच्या वापरासंदर्भात शासनाने जनभावनांचा आदर ठेवून तोडगा काढला असल्याचे सांगत विद्यानंद बापट यांच्या मराठी भाषेवरील निष्ठेचे कौतुक केले, मात्र उत्सव बंद करण्याच्या भूमिकेशी असहमती दर्शवली. अलोरे येथे दाखल होताच पालकमंत्र्यांचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. १२ सप्टेंबरच्या लोकार्पण सोहळ्यानंतर प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळणार असल्याने आपत्तीच्या जखमा झेलणाऱ्या तिवरे धरणग्रस्तांना हक्काचा आणि सुरक्षित निवारा लाभणार आहे.

Total Visitors :
4819917
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *