सहकारातून समृद्धीचा विचार देशभर पोहोचविण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी : सुभाषराव चव्हाण

Gramin Varta
51 Views

चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; मान्यवर व सभासदांकडून शतायुषी होण्याच्या सदिच्छा

चिपळूण : सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी चांगले काम उभे करण्याचा आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण करण्याचा आपला सातत्याने प्रयत्न राहिला आहे. सहकारातून समृद्धीचा विचार केवळ एका संस्थेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशभर पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे साथ द्यावी, असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी केले.

बहादूरशेखनाका येथील सहकार भवन सभागृहात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संचालिका सौ. स्मिता चव्हाण, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस. बी. पाटील, माजी सहनिबंधक, लेखापरीक्षण महाराष्ट्र राज्य पुणे तानाजी कवडे, व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालक सूर्यकांत खेतले, गुलाब सुर्वे, रवींद्र भोसले, मनोहर मोहिते, सत्यवान म्हामुनकर, राजेश वाजे, राजेंद्र पटवर्धन, प्रकाश साळवी, प्रकाश पत्की, प्रमोद साळवी, सोमा गुढेकर, अॅड. नयना पवार व सौ. निलिमा जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले की, वाढदिवस साजरा करण्याची पद्धत पूर्वी फारशी मान्य नसतानाही २००८ मध्ये मुलांनी व सहकाऱ्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी हा दिवस उपक्रमाच्या स्वरूपात साजरा करण्याची संकल्पना मांडली. त्यानंतर गेली १८ वर्षे हा कार्यक्रम संस्थेतील प्रेम, आपुलकी आणि विश्वास दृढ करणारे व्यासपीठ बनल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

*एका दिवसात २ कोटी ८८ लाखांच्या ठेवी*

यंदाच्या वाढदिवसानिमित्त निमंत्रण देताना ‘साहेबांचा वाढदिवस आहे, तुम्ही ठेव दिलीत तर बरे होईल,’ एवढेच सांगण्यात आले. मात्र, या आवाहनाला प्रतिसाद देत एका दिवसात तब्बल २ कोटी ८८ लाख रुपयांच्या ठेवी संकलित झाल्या. हा केवळ आर्थिक आकडा नसून संस्थेवरील लोकांच्या विश्वासाची पावती असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

सहकार हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, सर्वसामान्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सहकार चळवळीचा विस्तार आवश्यक आहे. पुढील पिढीला सहकाराशी जोडण्यासाठी १८ वर्षांखालील मुलांमध्ये बचत व सहकाराची सवय निर्माण करणारे उपक्रम व्यापक स्वरूपात राबविले पाहिजेत. माणसे जोडणे, योग्य व्यक्तींवर विश्वास ठेवणे आणि त्यांना संधी देणे ही संस्थेच्या यशाची प्रमुख सूत्रे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*‘चव्हाण यांचे नेतृत्व सहकारासाठी दिशादर्शक’*

सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस. बी. पाटील यांनी चिपळूण नागरीची वाटचाल ही केवळ आर्थिक यशाची नव्हे, तर सहकारातून समाजपरिवर्तन घडविण्याची कहाणी असल्याचे सांगितले. संस्थेने सुमारे दीड लाख सभासद जोडले असून, १६ हजार युवकांना व्यवसायासाठी कर्ज आणि १५ हजार शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले. ‘धनलक्ष्मी ठेव योजने’तून लहान मुलांमध्ये बचतीची सवय निर्माण करण्याचा प्रयोगही उल्लेखनीय असल्याचे पाटील म्हणाले.

भविष्यात सहकार विस्तारताना तंत्रज्ञानाचा स्वीकार, महिलांचा व युवकांचा सहभाग आणि दुर्लक्षित घटकांपर्यंत सहकार पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘चव्हाण साहेबांनी संपादित केलेला विश्वास हीच संस्थेची खरी भांडवलशक्ती आहे,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

*‘चव्हाण साहेब अनुभवाचे विद्यापीठ’*

माजी सहनिबंधक तानाजी कवडे यांनी सुभाषराव चव्हाण यांना ‘अनुभवाचे विद्यापीठ’ संबोधले. संस्था उभारणे सोपे असले तरी ती विश्वासार्हतेने सातत्याने चालविणे कठीण असल्याचे सांगत, संचालक, कर्मचारी, सभासद, ठेवीदार व कर्जदार यांच्यातील विश्वासाची साखळी ही चिपळूण नागरीच्या यशाची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेने आजवर एक हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक गरजा पूर्ण केल्या असून, सुमारे २२ कोटी रुपयांचा नफा आणि सातत्याने १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा उल्लेखनीय असल्याचे कवडे यांनी सांगितले. ‘फळ देणाऱ्या झाडालाच दगड मारले जातात,’ असे सांगत विरोधापेक्षा संयम, माणसांची पारख आणि निर्णयक्षमता ही चव्हाण यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘सहकाराच्या वाटेवरील विश्वासाचा दीपस्तंभ’ अशा शब्दांत त्यांनी चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला.

यावेळी सौ. स्मिता चव्हाण यांनी सुभाषराव चव्हाण यांचे औक्षण केले. चव्हाण यांनी केक कापून उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. संचालक मंडळ, अधिकारी-कर्मचारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच चव्हाण-यादव कुटुंबीयांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

‘आपल्याकडून मिळणारे प्रेम, सहकार्य आणि संस्थेच्या विकासासाठीची साथ हेच माझ्यासाठी वाढदिवसाचे खरे शुभाशीर्वाद आहेत,’ असे भावनिक उद्गार चव्हाण यांनी काढले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.

Total Visitors :
4819442
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *