करक धरणाची आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्याकडून पाहणी; नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना

Gramin Varta
386 Views

राजापूर / तुषार पाचलकर:  राजापूर-लांजा मतदारसंघातील करक धरण परिसराची आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी प्रत्यक्ष पाहणी करून धरणातील पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग तसेच परिसरातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून धरणाच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती जाणून घेत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या.

सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवावे, पाण्याच्या पातळीचे नियमित निरीक्षण करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश आमदार सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक ती दक्षता घेण्यावर त्यांनी भर दिला.

पाहणीदरम्यान धरण परिसरातील सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन यंत्रणांची तयारी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचाही त्यांनी आढावा घेतला. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी समन्वयाने काम करून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी नागरिकांना अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रशासनाला परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही हयगय होऊ नये, असे स्पष्ट केले.

Total Visitors :
4645742
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *