राजापूर/ तुषार पाचलकर: ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा आणि नेत्रसेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जवळेथर येथे नुकतेच एका भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवसेना, युवासेना आणि श्री ऑप्टिकल अँड कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक, पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र, जवळेथर येथे पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन सभापती सौं. नंदिनी कदम, शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, जिल्हा परिषद सदस्या सिद्धाली मोरे, युवासेना तालुका प्रमुख सुनील गुरव, उपविभाग प्रमुख उदय राणे, युवासेना विभाग प्रमुख युवराज मोरे, महिला विभाग प्रमुख श्वेता पवार आणि युवासेना विभाग प्रमुख विद्या लांजेकर यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रशासक सरपंच सौं. अंजली मोरे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी सरपंच सुरेश मोरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विलास मोरे, शिवसेना शाखा प्रमुख तुषार धावडे, युवासेना शाखा प्रमुख हितेंद्र सकपाळ आणि महिला शाखा प्रमुख मंगला धावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरादरम्यान श्री ऑप्टिकल अँड कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक, पाचलचे डॉ. प्रितेश गुरव, डॉ. अनिकेत इंदुलकर, डॉ. प्रतीक गुरव, सुयोग जाधव आणि अक्षय मोरे यांनी नागरिकांची डोळ्यांची तपासणी करून त्यांना योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन केले. या शिबिरात मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून, काहींना आवश्यकतेनुसार पुढील उपचाराबाबत व चष्म्याबाबत सल्ल्याचे वाटप करण्यात आले.
या आरोग्य शिबिरास डॉ. तांदळे, डॉ. प्रवीण, डॉ. कांबळे, कुवळेकर सिस्टर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जवळेथरचे सूरज पवार, अंकित कुळ्ये यांच्यासह संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामीण भागात राबवलेल्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाबद्दल नागरिकांनी आयोजकांचे मनःपूर्वक कौतुक केले असून, भविष्यातही अशा प्रकारच्या आरोग्यविषयक शिबिरांचे नियमित आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात येत आहे.





