खेडशीत बंद घराचे कुलूप तोडून २१ हजारांची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
5 Views

रत्नागिरी : शहरालगतच्या खेडशी येथील लक्ष्मी-नारायण नगर परिसरातील बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील पितळी व तांब्याची भांडी, नळ, मिक्सर, कपडे यासह एकूण २१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद गणपत विचारे (वय ६२, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. कृष्णकुंज बंगला, लक्ष्मी-नारायण नगर, खेडशी, रत्नागिरी; सध्या डोंबिवली, मुंबई) यांच्या मालकीचा बंगला खेडशी येथे आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६.२० वाजल्यापासून १० सप्टेंबर रोजी सकाळी ७.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत बंगला बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या पुढील दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने चार्जिंगची बॅटरी, एक समई व सात मोठी पितळी भांडी, तीन तांबे, दोन ताम्हाणे, एक पेला व एक पळीपात्र अशी तांब्याची भांडी, अॅल्युमिनियमचा डबा, बाथरूममधील दोन मिक्सर व तीन नळ तसेच आठ साड्यांसह वापरातील कपडे असा मुद्देमाल चोरून नेला. चोरीस गेलेल्या वस्तूंची एकूण अंदाजे किंमत २१ हजार ४०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटना लक्षात आल्यानंतर विनोद विचारे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4839571
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *