पेपरफुटीच्या संतापाचा उद्रेक; एमपीएससी सचिवांवर कार्यालयातच शाईफेक, संभाजी ब्रिगेडचे तिघे अटकेत

Gramin Varta
4 Views

मुंबई : औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधातील संताप आता आंदोलनाच्या पुढील टप्प्यावर पोहोचला आहे. सीबीडी बेलापूर येथील एमपीएससीच्या मुख्यालयात शुक्रवारी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्यावर काळी शाई टाकल्याची घटना घडली. या प्रकरणी सीबीडी पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या तीन पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

पेपरफुटीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, मुंबई अध्यक्ष सुहास राणे आणि अन्य एक पदाधिकारी हरपाळकर यांच्या भेटीस गेले होते. यापूर्वी गुरुवारीही त्यांची हरपाळकर यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर मोबाइलमधील काही कागदपत्रे दाखवायची असल्याचे सांगून त्यांनी पुन्हा भेटीची वेळ घेतली होती. त्यानुसार हरपाळकर यांनी त्यांना कार्यालयात बोलावले. भेटीदरम्यान पुस्तक देण्याच्या बहाण्याने हरपाळकर यांच्यावर काळी शाई टाकण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत समोर आले आहे.

या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. परीक्षेतील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. ‘परीक्षेची तयारी करून अभ्यास करायचा की वारंवार आंदोलन करण्याची वेळ यावी?’ असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चा काढला. एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आमखास मैदानापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

या संपूर्ण घडामोडींना आणखी गंभीर वळण देणारी घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली. गेल्या तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय सुशांत सुनील बल्लाळ याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सुशांत हा करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथील रहिवासी होता. त्याने सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षाही त्याने यापूर्वी उत्तीर्ण केली होती.

पेपरफुटीच्या आरोपांमुळे आधीच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असताना, सुशांतच्या मृत्यूने या प्रश्नाचे गांभीर्य आणखी अधोरेखित झाले आहे. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा तपास संबंधित पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitors :
4839531
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *