राजापूर तालुक्यात गव्यांचा धुमाकूळ; खरवते परिसरात भातशेतीसह आंबा-काजू बागा उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल

Gramin Varta
182 Views

राजापूर: तालुक्यातील खरवते गाव आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दिवसा तसेच रात्रीच्या वेळी शेतशिवारासह थेट लोकवस्तीतून निर्धास्तपणे वावरणाऱ्या सुमारे वीस गवा रेड्यांच्या कळपाने शेती व फळबागांचे मोठे नुकसान केले आहे. या कळपाने विजय गुरव आणि दयानंद चौगुले यांच्या आंबा-काजू बागांमधील झाडांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली असून, संतोष चौगुले यांच्या भातशेतीमध्ये शिरून उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. या परिसरात गव्यांचा वावर अद्यापही कायम असल्याने संभाव्य नुकसानीच्या भीतीने बागायतदारांसह सर्वसामान्य शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

गेल्या काही वर्षांपासून राजापूर तालुक्यामध्ये गवा रेड्यांच्या कळपांचा वावर सातत्याने वाढत असून त्यांच्याकडून होणाऱ्या नुकसानीचे प्रमाणही दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. आधीच माकडांकडून होणाऱ्या सततच्या उपद्रवामुळे आणि नासधुसीमुळे आंबा-काजू बागायतदार प्रचंड संकटात सापडले आहेत, तर विविध समस्यांमुळे परिसरातील भातशेतीचे क्षेत्रही झपाट्याने घटत चालले आहे. अशा बिकट परिस्थितीत आता थेट गवा रेड्यांकडून शेतीवर हल्ले होत असल्याने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

दरम्यान, गवा रेड्यांच्या कळपाने फळबागायती आणि भातशेतीचे केलेल्या नुकसानीची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. वनविभागाकडून या नुकसानीचे रीतसर पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, केवळ पंचनाम्यांवर न थांबता वनविभागाने या मोकाट गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी आता खरवते परिसरातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Total Visitors :
4830812
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *