राजापूर: तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अनघा पळसुलेदेसाई प्रथम; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Gramin Varta
77 Views

राजापूर (तुषार पाचलकर) : राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचलच्या अनघा गजानन पळसुलेदेसाई हिने उल्लेखनीय कामगिरी करत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. या दमदार कामगिरीच्या जोरावर तिची रत्नागिरी जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अनघाने स्पर्धेत आपल्या बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि डावपेचांचे प्रभावी प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तिच्या या यशामुळे पाचल परिसराच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात तिचे कौतुक होत असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही ती उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अनघाच्या या यशाबद्दल पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेश सावंत, कार्याध्यक्ष अशोक सक्रे, सचिव रामचंद्र वरेकर, सहसचिव किशोर नारकर, खजिनदार राजन लब्दे तसेच संस्थेचे सर्व संचालक यांनी तिचे अभिनंदन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा गुरखे, पर्यवेक्षिका प्रमिला गांधी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही तिच्या यशाबद्दल कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अनघाला प्रशालेचे क्रीडा शिक्षक नितीन सांडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिच्या कुटुंबीयांनीही सातत्याने प्रोत्साहन दिले. तालुकास्तरीय स्पर्धेतील यशानंतर आता जिल्हास्तरीय स्पर्धेत अनघा आपल्या खेळाची छाप पाडण्यासाठी सज्ज झाली असून, तिच्याकडून आणखी दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4833367
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *