मंडणगड : मंडणगड शहराच्या मध्यवर्ती भागातील जुन्या बसस्थानकाची इमारत पाडून त्या ठिकाणी सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त नवीन बसस्थानक उभारण्यात येणार असून, त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नव्या बसस्थानकामुळे प्रवाशांची दीर्घकाळापासूनची गैरसोय कायमस्वरूपी दूर होईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे भूमिपूजन तसेच तात्पुरत्या प्रवासी शेडचे लोकार्पण गुरुवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना योगेश कदम म्हणाले की, समस्या निर्माण झाल्यानंतर केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी त्यावर कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर आपला भर आहे. मंडणगड बसस्थानकाच्या जुन्या इमारतीमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही इमारत पाडून नवीन अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. नव्या इमारतीमुळे स्वच्छतागृहांसह प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतील. तसेच बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण करून प्रवाशांना अधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
बसस्थानक परिसरातील महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र मॉल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही कदम यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. केवळ बसस्थानकाची इमारत उभारून प्रश्न सुटणार नसून, आगारातील जुन्या व नादुरुस्त बसेस बदलून आगाराच्या मागणीनुसार नव्या बसेस उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. भविष्यात इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी जागा तातडीने निश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मंडणगड शहराच्या पाणीप्रश्नाबाबतही कदम यांनी महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. नगरपंचायतीच्या पाणी योजनेसाठी निधी मंजूर झाला असून, तांत्रिक अडचणी दूर करून योजनेचे काम जलदगतीने सुरू करण्यात येईल. शहरातील प्रत्येक घराला २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे, मंडणगड पंचायत समितीच्या सभापती प्रणाली चिले, नगराध्यक्ष सोनल बेर्डे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, दीप्ती घडशी, शशिकांत चव्हाण, तहसीलदार अक्षय ढाकणे, आगारप्रमुख मदनीपाशा जुनेदी, माजी सभापती अनंत लाखण, रामदास रेवाळे, विनोद जाधव, दीपक घोसाळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय कायमची दूर होणार : योगेश कदम
Leave a Comment




