चौकशीसाठी तीन-तीन वर्षे लागत असतील तर असा ढिम्म कारभार खपवून घेणार नाही; चुकीची कामे करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा
दापोली : जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करणे अपेक्षित असताना चौकशीसाठी तीन-तीन वर्षे लागत असतील, तर असा ढिम्म कारभार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. चुकीची कामे करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा कडक इशारा गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला.
पंचायत समिती दापोलीची आमसभा राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तब्बल सहा तास चाललेल्या या मॅरेथॉन आमसभेत तालुक्यातील विविध विभागांशी संबंधित जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. प्रश्नांची प्रभावी दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना कदम यांनी जाब विचारत संबंधित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामावरून सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरत कदम यांनी मागील वर्षी करण्यात आलेल्या सर्व खड्डे भरणीच्या कामांची क्वालिटी कंट्रोलमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. या कामांचा सविस्तर अहवाल चार दिवसांत सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महावितरणकडून रस्ते आणि सिमेंट गटारे फोडून वीजवाहिन्यांची कामे केली जात असतील, तर त्यानंतर रस्त्यांची दुरुस्तीही महावितरणनेच करावी अथवा त्यासाठी आवश्यक निधी संबंधित विभागाकडे वर्ग करावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव राहता कामा नये, असेही त्यांनी बजावले. जिल्ह्यात महावितरणकडून खोदण्यात आलेल्या रस्त्यांचा आढावा घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांनी दिल्या.
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरही आमसभेत चर्चा झाली. शासनाच्या निर्णयानुसार ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर परस्पर बसविले जाणार नाहीत, असे कदम यांनी स्पष्ट केले. ‘पीएम सूर्यघर योजने’चा लाभ दापोली तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. एका ग्राहकाला तब्बल २१ हजार रुपयांचे चुकीचे वीज बिल पाठविल्याच्या तक्रारीची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ग्राहकांची जाणीवपूर्वक फसवणूक झाल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. दापोलीतील पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरणला दिल्या.
एसटी प्रशासनाशी संबंधित प्रश्नांवरही आमसभेत राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट भूमिका घेतली. शाळांना सुट्टी असली तरी गावातील एसटी फेऱ्या बंद करू नयेत, त्या गावकऱ्यांच्या सोयीसाठी सुरू ठेवाव्यात, असे त्यांनी निर्देश दिले. एसटीच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात नुकसान झालेल्या बाधिताला वर्ष उलटूनही नुकसानभरपाई मिळाली नसल्याच्या प्रकरणात तातडीने भरपाई देण्याचे आदेश त्यांनी दिले. भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या ४६ कोटी रुपयांच्या निधीसाठी मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आमसभेत आंबा-काजू हमीभाव, जलजीवन मिशन, महसूल, वनविभाग, आरोग्य, भूमी अभिलेख तसेच पोलीस विभागाशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रत्येक विभागाने जनतेच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यावर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असे कदम यांनी सांगितले. आमसभेत मांडण्यात आलेल्या सर्व समस्या आणि मागण्यांवर संबंधित विभागांनी येत्या सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश देत त्यांनी अधिकाऱ्यांना कामकाजात हलगर्जीपणा न करण्याचा स्पष्ट इशारा दिला.
या आमसभेला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, उपसभापती नम्रता तोडणकर, नगराध्यक्ष कृपा घाग, प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांच्यासह पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दापोली पंचायत समितीची तब्बल सहा तास आमसभा; कामचुकार अधिकाऱ्यांना राज्यमंत्री योगेश कदम यांचा दणका
Leave a Comment




