रत्नागिरी : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचताना गोविंदांना अपघात होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने विशेष विमा संरक्षणाची योजना लागू केली आहे. त्यामुळे दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना अपघाताच्या प्रसंगी आर्थिक आधार मिळणार आहे.
यंदा ४ सप्टेंबर रोजी गोपाळकाला, तर ५ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडूनही आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे.
दहीहंडीच्या मानवी मनोऱ्यांदरम्यान अपघात होऊन सहभागी गोविंदांना दुखापत होण्याच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाने विमा संरक्षणाची तरतूद केली आहे. अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. दोन अवयव अथवा दोन डोळे गमावल्यास पाच लाख रुपये, तर एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास अडीच लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. याशिवाय रुग्णालयीन उपचारांचा खर्चही विमा संरक्षणात समाविष्ट करण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदाचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मंडळाने अधिकृत नोंदणी करून आयोजनाच्या सुरक्षाविषयक नियमांचे पालन करणेही बंधनकारक आहे. नोंदणीकृत गोविंदांच्या संख्येनुसार विम्याची रक्कम अदा केली जाणार आहे.
हे विमा संरक्षण केवळ दहीहंडीच्या मानवी मनोऱ्याच्या रचनेदरम्यान किंवा उत्सवातील प्रत्यक्ष क्रीडा प्रकारात झालेल्या अपघातांसाठी लागू राहणार आहे. इतर खासगी दुर्घटनांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
गोविंदा पथकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. नोंदणी झाल्यानंतरच संबंधित गोविंदांना विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
दहीहंडी आयोजकांनी उत्सवादरम्यान सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच पोलिस, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दहीहंडी उत्सवाला मिळणार विम्याचे संरक्षण; गोविंदांना १० लाखांपर्यंत सुरक्षा कवच
Leave a Comment






