रत्नागिरी : दोन दिवसांपूर्वी मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ‘अल रिझवान’ या नौकेच्या इंजिन पंख्यात अचानक कचरा आणि जाळे अडकल्याने गंभीर दुर्घटना घडली. पंखा निकामी झाल्यामुळे इंजिन बंद पडले आणि समुद्रातील वादळी वाऱ्यासह पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तांडेलचे नौकेवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. परिणामी ही नौका भरकटत थेट कुर्ली समुद्र किनाऱ्यावरील खडकांवर जाऊन आदळली. मोहम्मदमिया इब्राहिम मस्तान यांच्या मालकीच्या या मासेमारी नौकेचे खडकांवर आदळल्यामुळे सुमारे १५ लाखांचे मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने या दुर्घटनेत नौकेवरील सर्व खलाशी सुरक्षितरीत्या बाहेर पडण्यात यशस्वी ठरल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या ही नौका किनाऱ्यावरील वाळूत खोलवर रुतल्याने तिला बाहेर काढण्याच्या प्रयत्नांत मोठे अडथळे येत असून दुरुस्तीसाठीही मोठा खर्च अपेक्षित आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक मत्स्य आयुक्त जीवन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी चिन्मय जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीचा रीतसर पंचनामा केला.





